Maharashtra Rain Update मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रमुख शहरांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट Maharashtra Rain Update
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस):
- कोकण: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग.
- मराठवाडा आणि इतर भाग: परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक आणि घाटमाथा.
- यलो अलर्ट: राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी
आज सकाळी मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळच्या वेळी शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांची आणि कामावर जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने २५ ऑगस्ट रोजी मुंबई आणि उपनगरांसाठी आधीच पावसाचा इशारा दिला होता. काही तासांच्या पावसामुळेच अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल सेवा ठप्प झाली होती, अनेक लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सध्या राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच या पावसाने अडचणी वाढवल्या आहेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुढील 24 तासांसाठी महाराष्ट्राचा हवामान अंदाज, कुठे पाऊस, कुठे विश्रांती?